गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोणाच सावट पसरलेले असतानाच आपणही त्यातून वाचलेलो नाही. शेती, उद्योग धंदे, छोटे-मोठे व्यावसायिक या सर्वांवर समाजाचा, माध्यमांचा, प्रशासनाचा जेवढा विचार होत होता ….. तुलनेनं सर्वात महत्त्वाचं आणि ज्याची हानी पैशात होत नसली तरी भविष्यामध्ये नक्कीच जाणवणार आहे अशा शिक्षण क्षेत्राकडे म्हणावं तेवढं लक्ष कोणाचं गेलेलं नाही…
सर्वत्र शाळा ओस पडल्या, गवतानं मैदानं माखली गेली. कुणीच शाळेकडे फिरकेनासं झालं. कधी काळी इथं शाळा भरत होती यावर पाहणाऱ्यांचा विश्वास बसेना अशी सर्वत्र अवस्था असताना… आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या डोक्यातून “स्वच्छ सुंदर शाळा अभियान”ही संकल्पना पुढ आली. सुरुवातीला सर्वांनाच वाटलं शाळेत मुलं नाहीत शिक्षक संख्या कमी आहे पालकांचं शाळेकडे येणं-जाणं बंद झाला आहे अशा परिस्थितीत हे कसं काय शक्य आहे बुवा! पण एक मिटिंग झाली! आणि संपूर्ण जिल्ह्यात शाळा स्वच्छता रंगरंगोटी ची चळवळ सुरू झाली. हळूहळू याचं रूपांतर स्पर्धेमध्ये झालं.. मग कोणी सांगतोय म्हणून करावं !यापेक्षा शिक्षकांनाच वाटायला लागलं आपली शाळा स्वच्छ सुंदर व्हायला हवी…
संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक-पालक ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती कामाला लागले. बाग बगीचा वृक्षारोपण शाळा रंगरंगोटी वर्ग स्वच्छता मैदान सपाटीकरण स्वच्छतागृहांची सोय पाण्याची सोय या आणि यासारख्या कितीतरी गोष्टी शाळेत पुन्हा नव्याने दिसू लागल्या.. सर्वांना शाळेत बसू वाटायला लागलं…. दोन वर्षापासून आलेली मरगळ सर्वांची दूर झाली… कोरोनामुळे सर्वांची मनं निगेटिव असताना… एखादे अधिकारी एखादी नवकल्पना पुढे आणून कुणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सर्वांना केवळ शब्दांच्या जोरावर कसं पॉझिटिव्ह करू शकतात हे याचं एक उत्तम उदाहरण…..
जशा शाळा सुंदर दिसू लागल्या तशीच मुलंही लवकरच शाळेत येतील. पुन्हा शाळेतली गजबज ,लगबग गलका आणि शाळेची घंटा ऐकायला येईल याच एका आशेवर संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक आहेत. साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद.
एक प्राथमिक शिक्षक






















