सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नट्टापट्टा करून परदेशात फिरण्याशिवाय आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही त्यांनी आता आपले नाटक बंद करावे कारण त्यांचा देशाला किळस येऊ लागला आहे. अशा सोलापुरी भाषेत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या वतीने खोटा आरोप दाखल करून गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा दिली. त्याविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान दिले असता स्थगिती देण्यास नकार दिली. भाजपा आणि मोदी सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांचे तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल, आणि लोकशाहिचा गळा घोटण्याऱ्या भाजप आणि मोदी सरकार विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, प्रवक्ते प्राध्यापक अशोक निम्बर्गी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, नगरसेवक बाबा मिस्त्री , माजी महापौर सुशीला आबुटे, माजी नगरसेविका फिरदोस पटेल, अनुराधा काटकर, एन के क्षीरसागर, श्रीशैल रणधीरे, प्रवीण निकाळजे, मकबूल मोहोळकर, तिरुपती परकीपंडला त्यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

















