सोमवार दि. २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे. या दिवशी वडाळा ता. उत्तर सोलापूर येथील लोकमंगल कॉलेजच्या परिसरात कृषि पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असून त्यात सहभागी होणारांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत कृषि संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येणार आहे. सहा तास हस्तकला, मनोरंजन, न्याहारी, गावरान जेवण, असा सारा मेनू असणार आहे.
या दिवशी लोकमंगल कॉलेजच्या परिसरात सुरू असलेल्या सगळ्या कृषि प्रकल्पांना भेटी देता येतील. त्यात शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, शेततळे, बायोगॅस, नक्षत्र गार्डन, गांडूळ खत प्रकल्प, जलसंधारण, कम्युनिटी रेडिओ स्टेशन,घन कचरा व्यवस्थापन या प्रकल्पांचा त्यात समावेश असेल. शिवाय गावातला कुंभार फिरत्या चाकावर मातीला कसा आकार देतो याचे प्रात्यक्षिक पाहता येणार आहे. मातीकाम, मेंदी काम, वारली चित्रकला अशा कलांचे सादरीकरणही होणार आहे.
या दिवसभरात करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जातील तेही अस्सल ग्रामीण भागाशी संबंधित असतील. वासुदेव,पोवाडा, हलगी, संबळ, वाघ्या मुरळी, पोतराज हे आपले सादरीकरण करतील. त्यातून ग्रामीण भागातल्या आणि आपल्या संस्कृतीतल्या निरनिराळ्या वाद्यांचाही परिचय सर्वांना होईल. लहान मुलांना करमणुकीसाठी घसरगुंडी तर असेलच पण त्यांना घोड्यावर बसून रपेटही करता येईल. बैलगाडीतून शिवार फेरी मारता येईल.
एकंदरीत दिवसभरात ग्रामीण जीवनाचे दर्शन घडेल. कृषि संस्कृतीची झलक पहायला मिळेल. दिवस मजेत जाईल आणि मजा करता करता ज्ञानात भरही पडेल. आपली संस्कृती समजून घेताना मनाला समाधान वाटेल. हे सारे कार्यक्रम वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयाच्या परिसरात होतील. तिथे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वडाळा हे गाव सोलापूरपासून ३० किलो मीटर्स अंतरावर आहे.
पर्यटकांना घेऊन जाणारी बस सकाळी ९ वाजता सोलापूरच्या पुना नाक्यावर केली जाईल आणि सर्व पर्यटकांना त्याच जागी ४ वाजता आणून सोडले जाईल. या समारंभात सहभागी होण्यासाठी प्रौढ व्यक्तीस २५० रुपये आणि लहान मुलांस १५० रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. या शुल्कात प्रवास, जेवण, नाष्टा आणि चहा दिला जाईल. अधिक माहितीसाठी फोन क्र. ९९२३४०४६९७ यावर संपर्क साधावा.
















