सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जुना आणि मोठा समजला जाणारा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. हा कारखाना सध्या मल्टीस्टेट दर्जाचा झालेला आहे त्यामुळे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जिल्हा उपनिबंधक किंवा जिल्हाधिकारी देतील तो अधिकारी हा निवडणूक निर्णय अधिकारी असतो कारखान्याला निवडणूक घेताना कोणता अधिकारी पाहिजे हा मागण्याचा पर्याय कारखान्याकडे असल्याची माहिती आहे.
सध्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बेकायदेशीररीत्या बांधलेल्या चिमणी मुळे चांगलाच चर्चेचा विषय झालेला आहे. या आडून कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या ही अडचणी मागील काही वर्षांपासून प्रचंड वाढल्या आहेत शासन दरबारी पळापळ उच्च न्यायालयात पळापळ करून ते दमले आहेत. बेकायदेशीर चिमणी पाडण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही ती चिमणी पाडली जात नाही.
आता लवकरच कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे काडादी यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हा निबंधक हे नको असल्याचे समजते. त्यामुळे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतल्याची माहिती असून त्यांना कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांना पसंती दिली असून वाघमारे यांची नियुक्ती करावी अशी मागणी काडादी यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे केल्याचे समजले.
भारत वाघमारे यांच्या नियुक्तीला जिल्हाधिकार्यांनी अद्याप हिरवा कंदील दाखवला नाही अथवा वाघमारे यांनी ही आपला होकार कळवला नाही मात्र येत्या काही दिवसात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करायची हे जिल्हाधिकारी ठरवतील. सिद्धेश्वर कारखान्याचे 51 हजार सभासद मतदार आहेत यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सोलापूर जनता सहकारी बँकेची निवडणूक कोणत्याही महसूलचा एक ही कर्मचारी न घेता यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामध्ये 56 हजार सभासद होते याचा विचार करता जिल्हाधिकारी आता निवडणूक उपनिबंधकाकडे देतात की भारत वाघमारे यांच्याकडे याकडे लक्ष लागले आहे.

















