राजेंद्र विश्वनाथ भोसले वय ५० असे त्यांचे नाव आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे औषध फवारणी पंप बंद करत असताना स्टार्टरमधील विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.
मयत राजेंद्र भोसले यांनी शेतात दोडके, घेवड्याची लागवड केली आहे. शनिवारी ते पत्नी व मुलगा रंजित यांच्यासोबत शेतात लाकडे रोवण्याचे काम करत होते. दिवसा पाणीपुरवठा असल्याने घेवड्याला औषधाची फवारणी करून एचडीपी फवारणी यंत्राचे स्टार्टर बटन बंद करत होते.
यावेळी विद्युत पेटीतील स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने राजेंद्र यांना जोराचा विद्युत झटका बसल्याने ते जागेवरच बेशुद्ध अवस्थेत पडले. मुलगा रंजित याने फ्यूज बंद केला. बेशुद्धावस्थेतील राजेंद्र भोसले यांना ज्ञानेश्वर भोरे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



















