दिलीप स्वामी यांनी 11 नोव्हेंबर 2020 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला, त्यानंतर माझे गाव, कोरोना मुक्त गाव, माझे दुकान माझी जबाबदारी, माझे मुल माझी जबाबदारी, माझी शाळा माझी जबाबदारी, गाव तेथे कोविड सेंटर, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा, स्वच्छ व सुंदर शाळा, अधिकार्यांची गावात प्रभात फेरी, अधिकाऱ्यांचा गाव भेट दौरा असे विविध उपक्रम सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबवले
माझे गाव कोरोनामुक्त गाव हा तर उपक्रम राज्य सरकारने स्वीकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतूक करत सीईओ दिलीप स्वामी यांचा आपल्या फेसबुक पेजवर विशेष उल्लेख केला आहे. स्वच्छ व सुंदर शाळा हा उपक्रम ही राज्यात राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला. कोरोनाची दुसरी लाट युवा वर्गासाठी भयानक होती. कोरोना झाल्याने घाबरून मरणाऱ्यांची संख्या वाढली ती भीती आणि कोरोनाची दहशत मनामधून आणि डोक्यामधून घालवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तालुकास्तरावरील कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी ताणतणाव मुक्त व्यवस्थापन कार्यशाळा घेत स्वतः मार्गदर्शन केले, एवढंच नाही तर योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून कोरोना मुक्तिचे धडे तेसुद्धा कोविड सेंटर मध्येच रुग्णांना दिलेत. या उपक्रमांचा खूप मोठा फायदा कोरोना रुग्णांना झाल्याचं पहायला मिळालं.
कोरोनाची दुसरी लाट ओसरते नाही तोच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आणि ही तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. भविष्याचा विचार करून दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील सुमारे नऊ लाख बालकांच्या आरोग्य तपासणीची मोहीम हाती घेतली. यामध्ये पाच लाखाहून अधिक बालकांची आरोग्य तपासणी झाली आहे त्यात जवळपास साठ बालके कोरोणा पॉझिटिव तर सुमारे साडेसहाशे बालके ही कोरोना सदृष्य आजाराची आढळून आली मात्र वेळेवर उपचार झाल्याने एकाही बालकाच्या जीवाला धोका झाला नाही हे सोलापूर जिल्ह्यासाठी महत्वाचीच बाब म्हणावी लागेल.
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल तीनशेहून अधिक गावे ही संपूर्ण महिनाभर कोरोनामुक्त राहिली आहेत महिनाभरात एक ही कोरोनाचा रुग्ण या गावांमध्ये मिळून आला नाही त्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याची संकल्पना दिलीप स्वामी यांनी राज्य शासनाला समोर मांडली तसा प्रस्तावही पाठवला विशेष म्हणजे याची दखल संपूर्ण राज्यभरात घेण्यात आली, ज्या गावात एक महिनाभर एकही कोरोना रुग्ण नाही त्या गावात आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला हे सोलापूर जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासाठी गौरवाची बाब होती.
दिलीप स्वामी यांच्या कोरोनामुक्त गाव या पॅटर्नची व स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमाची दखल राज्य सरकारने तर घेतलीच आहे मात्र यशदा या प्रशासकीय संस्थेच्या यशमंथन मासिकात सोलापूरचा गाव कोरोनामुक्त पॅटर्न लक्षवेधी ठरला.
कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत नसेल तर सेवा निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती वेतन मंजूरीसाठी हेलपाटे मारावे लागतात. कर्मचार्यांची ही अडचण लक्षात घेऊन सीईओ स्वामी यांनी काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली होती.
सर्व संवर्गातील 14000 कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत झाल्यानंतर या सेवा पुस्तकांचे डिजिटायझेशन करून मोबाईल वर उपलब्ध करून दिल्यास सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोयीस्कर होईल अशी संकल्पना सीईओ स्वामी यांनी मांडली. त्यानुसार दोन महिने ई सेवा पुस्तक मोबाईल ॲप तयार करण्याचे काम सुरू होते. त्या यशस्वी ॲप’चा दिनांक 1 नोव्हेंबर रोजी अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम ही आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये राबविला जाणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे शाळा बंद होत्या मात्र त्यांनी आपल्या संकल्पनेतून झेडपीच्या शाळा स्वच्छ व सुंदर करण्याचा उपक्रम हाती घेतला. यात लोकसहभाग घेतल्याने या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. लोकसहभागातून एक नाही दोन नाही तर तब्बल 6 कोटी रुपये जमा झाले त्यातून अडीच हजार शाळा स्वच्छ व सुंदर करण्यात आल्या आहेत. शाळेचे हे रुपडे पाहून विद्यार्थ्यांसह पालकांनी सुध्दा तोंडात बोटे घातली आहेत. हा उपक्रम इतका चर्चेचा झाला की,याची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांना प्रेझेन्टेशन देण्यासाठी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निमंत्रण दिले आहे.
गेली कित्येक दिवसांपासून ज्या मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रतिक्षा होती ती गुरुवार 16 सप्टेंबर रोजी अगदी सुरळीतपणे पार पडली. कोणाचीही काहीही तक्रार नाही, गोंधळ नाही, हसत खेळत ही प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन समुपदेशन पध्दतीने पार पडली. दिव्यांग, अस्थिव्यंग व इतर अशा 200 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती करून समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्यात आली. यामध्ये एकुण 56 दिव्यांग शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला.
एक पद, एक वृक्ष या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील सुमारे पंधरा हजार अधिकारी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सरपंच यांनी एकच झाड लावायचं आणि ते वर्षभर सांभाळायचे ही जबाबदारी सीईओ स्वामी यांनी वाटून दिली. दिलीप स्वामी यांचा हा उपक्रम जिल्ह्यात एक प्रकारची चळवळ झाला. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत शेकडो वृक्ष लावले आहेत, स्वामी यांचा हा उपक्रम महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अंगीकारला.
आयएएस अधिकारी काय करू शकतो हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे .त्यांनी केवळ एका वर्षात सोलापूर जिल्हा परिषदेला राज्यात एका उंचीवर नेऊन बसवले आहे. यापुढे त्यांना पदाधिकारी, सदस्य आणि विभाग प्रमुख तसेच सर्वच कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांची आवश्यकता आहे.


















