सोलापूर : माजी आमदार दिलीप माने आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे ही दोन नेते जेव्हा एकत्रित येतात तेव्हा कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार नसतो परंतु जेव्हा यांच्यामध्ये बिनसतं तेव्हा बराच फटका तालुक्याला बसतो आणि त्याचा फायदा इतर पक्षाला होतो असं बराच वेळ झाले आहे.
मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला उत्तर तालुक्यात फायदा झाला पहिल्यांदाच भाजपला सभापती होण्याचा मान मिळाला त्यानंतर बाजार समितीला हे दोन नेते एकत्र आले त्यांनी त्यावेळच्या सहकार मंत्र्यांना धूळ चारली पुन्हा सभापती निवडीत एकत्र आले तिथेही भाजपला एकटे पाडले आता बाजार समितीच्या सभापती बदलाचा विषय सुरू झाला जवळजवळ दोन वर्षांहून अधिक काळ भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सभापती पदावर काढला आहे असे असताना बदलाच्या हालचाली सुरू झाल्या मालक आणि काकांनी एकत्रित येऊन बदल करण्याचे ठरवले मात्र अचानक काका साठे यांनी यातून माघार घेतली त्यामुळे मालक काकांवर नाराज असल्याचं अनेक कार्यक्रमातून दिसून येत आहे.
दिलीप माने हे सध्या उत्तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दौरे करत आहेत पृथ्वीराज माने युवा मंचच्या माध्यमातून शिस्तीत आणि पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये माने मालक काका साठे यांच्या विरोधकांचा कौतुक करताना दिसत आहेत. हिप्परगा तलाव जलपूजन, गावडी दारफळ तलावाचे जलपूजन हे मोठ्या दिमाखात झाले. सोमवारी दुपारी काही पत्रकार जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या जिल्हा परिषदेतील केबिनमध्ये चर्चा करत होते तेव्हा दिलीप माने यांच्या बद्दल विचारले असता काकांनी सध्या आमचं बिनसलंय, बाजार समितीच्या सभापती बदलाला मी पुढाकार घेतला मात्र दिलीप माने यांनी अजित पवार कडून सांगण्याची गरज काय होती, तीच गोष्ट आपणाला आवडली नाही असे काका साठे म्हणाले.
यावरून काका आणि मालकात बिनसल्याचं स्पष्ट झालं त्याच नंतर साधारण तासभरानी दिलीप माने हे आपल्या अनेक समर्थकांसह जिल्हा परिषदेत आले होते त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर ते बाहेर पडले, तेव्हा पत्रकारांनी मालक, काका वर बसले आहेत भेटला नाहीत का? असे विचारले असता सकाळी वडाळ्याला गेलो होतो तिथे भेट झाली असे म्हणून ते निघून गेले, दिलीप माने हे आगामी विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहेत अशा वेळी जिल्हाध्यक्ष सोबत न जुळणे हे राष्ट्रवादी साठीच अडचणीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


















