सोलापूर : काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल यांना वाढदिवसादिनी शुभेच्छासह भावी खासदारकीच्याही शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या नेत्याने राष्ट्रवादीच्या नेत्याला खासदारकीच्या शुभेच्छा दिल्याने काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्त्यांसह शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यातून संताप व्यक्त केला गेला. चेतन नरोटे यांनी आरिफ शेख यांना यापुढे जबाबदारीने वक्तव्य करावे अशी एक प्रकारे तंबी भरली. त्याला आरिफ शेख यांनी नर्माईने घेत जादा बोलणे टाळले. परंतु या सर्व घडामोडींमध्ये सुधीर खरटमल यांची मात्र चांगलीच मार्केटिंग झाली आता रस्त्यावरून जाताना त्यांना लोक खासदार साहेब म्हणू लागले आहेत.
या प्रकरणामुळे काँग्रेस शहराध्यक्ष नरोटे आणि माजी महापौर आरिफ शेख यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर बुधवारी पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते माजी आमदार दिलीप माने यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील सातशे महिलांना अष्टविनायक दर्शनाला नेले आहे. तत्पूर्वी सकाळी साडेसहा वाजता डॉक्टर आंबेडकर चौकात दिलीप माने, चेतन नरोटे, आरिफ शेख यांची भेट झाली. या दोघांमधील अंतर्गत वाद दिलीप माने यांनी मिटवल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. यानंतर हे सर्व नेते नेत्यांनी मिळून बेगमपेठमध्ये येऊन चहा घेत तोंड गोड केले. या प्रकरणात दिलीप माने यांना मध्यस्थी करावी लागली हे विशेष आहे.
दिलीप माने यांच्या नव्या ‘गेटअप’बाबत सोलापुरात सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे. डोक्यावर टोपी, धोतर, सदरा, गळ्यात शेला असा माने यांचा पोशाख असल्याने ते सेम टू सेम राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रमाणे दिसत आहेत. अशी चर्चा ऐकण्यास मिळाली. त्यामुळे या दोघांना जर शेजारी-शेजारी उभे केले तर यातील खरे अब्दुल सत्तार कोण?असा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही.



















