सोलापूर : शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे रोखण्याकरीता पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीत मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस आयुक्तालय माहिती कक्षातून देण्यात आली.
१७ ऑगस्ट रोजी सपोनि महाडिक यांचे तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक जण सुनील नगर एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीजवळ चोरी केलेल्या दुचाकी विकण्यासाठी आला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्याची पडताळणी करता, काटेरी झाडांच्या बाजूस एक जण पाच मोटरसायकली लावून एका दुचाकीवर बसला असल्याचे दिसून आले. त्यास सपोनि महाडिक यांचे तपास पथकाने ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत त्याचे नाव अविनाश मारुती विटकर, (वय -३८ वर्षे, रा. ४०९, न्यु पाच्छा पेठ, खड्डा तालीमच्या पाठीमागे, सोलापूर) असे असल्याचे सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने या ०५ मोटार सायकली चोरी करुन आणल्याची कबुली दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील ०३ गुन्हे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील ०१ गुन्हा आणि वळसंग पोलीस ठाण्याकडील ०१ गुन्ह्याचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले.