सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार हे शनिवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरकुल चौकीत उपस्थिती लावून गेले. जवळपास दोन तास पोलिसांनी चौकशी केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने किरण लोहार यांनी माझी फसवणूक केली आहे. विविध अमिशे दाखवून लाखो रुपये उकळले असा आरोप जाकेरा फिरदोस शाहिद खान यांनी केला होता.
घरकुल चौकीचे पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांनी अधिक खोलात जाऊन तपास करत,तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार,सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेले शिपाई संजय सातपुते, राकेश गायकवाड तसेच विद्यमान शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना घरकुल पोलीस चौकीत चौकशीसाठी बोलावून घेतले होते. संबंधित महिलेच्या समोर सर्व बाबींचा तपास पोलिसांनी केला आहे.
सोलापूरमधील एका खाजगी शाळेला वर्गवाढीची मान्यता देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केली होती.तडजोडी नंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. ३१ ऑक्टोबर 2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर युनिटने सापळा कारवाई करत ,प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रंगेहाथ पकडले होते. याबाबत सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जाकिरा फिरदोस खान, शाहिद उल्लू खान या दोघांना बोगस शिक्षणाधिकारी म्हणून शाळा तपासणी करत असताना पकडण्यात आले होते. बोगस शिक्षणाधिकारी सापडल्यानंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी २२ डिसेंबर २०२२ रोजी वळसंग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील झाला आहे. याच महिलेने २८ डिसेंबर २०२२ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात येऊन मोठा गोंधळ केला होता. तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी मला शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले. शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा असे सांगत पैसे घेण्यास सांगितले.
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरकुल पोलीस चौकीत शनिवारी सायंकाळी तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी उपस्थिती लावली होती. जाकेरा खान ही संशयित महिला देखील पोलीस चौकीत हजर होती. पोलिसांनी समोरासमोर विचारपूस करण्यास सुरुवात केली. ही विचारपूस जवळपास दोन तास सुरू होती.यामध्ये संबंधित महिलेने किरण लोहार यांवर गंभीर आरोप केले. महिलेचे जबाब नोंदवून व किरण लोहार यांचा जबाब नोंदवून पोलीस प्रशासन चार्जशीट कोर्टात दाखल करणार आहेत.
शुक्रवारी दुपारी विद्यमान शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी शिक्षण खात्यातील दोन शिपाई संजय सातपुते व राकेश गायकवाड हे देखील चौकीत उपस्थित होते. या दोन्ही शिपाई सोबत संबंधित महिलेचे मोबाईल कॉल रिकॉर्डिंग देखील आहेत. ते रिकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत केले आहे,लवकरच या सर्व बाबींचा तपास होणार आहे.


















