भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील उमरड जिल्हा परिषदेची शाळा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले आहे. या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक सिताराम भिल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल शिक्षक अनिल यादव यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त अभिमान शाळेत यशस्वीपणे राबविले आहे. उमरड शाळेने नवीन वर्षात नऊ दिवसात नऊ निकष पूर्ण करून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, शिक्षण विस्ताराधिकारी अनिल बदे, केंद्रप्रमुख नवनाथ ससाने आदींनी शाळेचे अभिनंदन केले आहे.
उमरड जिल्हा परिषद शाळेने तंबाखूमुक्त अभियानात सहभाग घेत हे अभियान यशस्वी केले. तंबाखूमुक्त अभियानासाठी महाराष्ट्र सरकार आणि सलाम मुंबई फाउंडेशनने घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे. भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशाला अधिक आरोग्यसंपन्न, उत्कृष्ट युवक देण्याचे काम उमरड शाळेतून होईल.
– संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी,
ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम करण्यासाठी विविध सामाजिक घटकांना एकत्र करून शाळा तंबाखूमुक्त करणे. या सोबतच शालेय शिक्षणातून तंबाखू नियंत्रण ,स्वच्छता आणि पोषणमूल्य या संदर्भात जनजागृती करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सलाम मुंबई फाउंडेशन करीत आहे. या अभियानाद्वारे समाजात शाश्वत बदल घडून मुले तंबाखूमुक्त निरोगी आयुष्य जगू शकेल.
– शुभांगी लाड, जिल्हा समन्वयक, सलाम मुंबई फाउंडेशन.