सोलापूर जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नियोजन भवनात घेण्यात आली. यंदा जिल्हा नियोजन समितीमध्ये 18 नवे सदस्य घेण्यात आले आहेत. सभेवेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दीपक आबा साळुंखे पाटील, उत्तमराव जानकर, चेतन नरोटे, अस्मिता गायकवाड यांच्यासह काही नवीन सदस्य पहिल्या रांगेत बसले होते.
यानंतर भाजपचे आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते हे एकत्र आले. त्यांना बसायला पहिल्या रांगेत खुर्ची नव्हती तेव्हा पालकमंत्र्यांनी आमदारांना पहिल्या रांगेत खुर्ची द्या अशा सूचना समोर बसलेल्या काही सदस्यांना केल्या. त्यापैकी राजेंद्र राऊत यांना आमदार प्रशांत परिचारक यांच्या रांगेत ऍडजेस्ट केले मात्र आमदार सातपुते, अवताडे व कल्याणशेट्टी यांना खुर्ची नव्हती तेव्हा जिल्हा परिषदेचे पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांनी त्यांना खुर्ची देत सभागृहाच्या डाव्या बाजूला बोलवले त्याठिकाणी हे तिन्ही आमदार एकमेकांच्या शेजारी बसले.
एवढ्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे आले असता पालकमंत्र्यांनी काकांना पुढे येण्यास सांगितले आणि त्यांना पहिल्या रांगेत संजयमामा शिंदे यांच्या शेजारी खुर्ची देऊन बसवले. इतक्यात ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांचे आगमन झाले त्यांना बसायला जागा नव्हती, खुर्ची नव्हती, भाजपच्या दोन नगरसेविका पुढच्या रांगेत होत्या, त्यांनी खुर्ची दिली नाही त्यावेळी सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या स्वाती कांबळे यांना उठावे लागले आणि त्यांची खुर्ची सुभाष देशमुखांना दिली तेव्हा स्वाती कांबळे यांनी संतापून पालकमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली, प्रत्येक वेळी महिलांना उठूनच खुर्ची द्यावी लागते तुम्ही नियोजन करत का नाही? त्यांच्या सुरात आमदार सातपुते यांनीही सूर मिसळला मात्र महिला सदस्य कांबळे यांचे बोलणे पालकमंत्र्यांना पटले नाही त्यांनी असे बोलणे योग्य नाही आम्हीही सदस्य आहोत असे म्हणून आपली नाराजी व्यक्त केली.
यानंतर जिल्हा नियोजन समितीमध्ये नव्याने आलेल्या 18 सदस्यांचा सत्कार करण्यात आला सुरुवातीला मंगळवेढा पंढरपुर मतदार संघाचे नूतन आमदार समाधान आवताडे यांचा सत्कार अपेक्षित होता मात्र त्यांचं नावच जिल्हा नियोजन अधिकारी दराडे हे विसरले तेव्हा आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांचा सत्कार करा ते पहिल्यांदाच सभागृहात आलेत असे सांगताच पालकमंत्र्यांनी खरेतर आमदार आवताडे यांचा आज पहिल्यांदा सत्कार करायला अपेक्षित होता असे सांगून वेळ मारून नेली.
याचवेळी पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड यांचेही नाव दराडे विसरले होते मात्र ते दिसताच त्यांचाही सत्कार करण्यात आला. सभा सुरू होऊन बऱ्याच वेळानंतर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचे आगमन झाले त्यांना बसायला खुर्ची कोण देणार असा प्रश्न होता मात्र समाज बांधव म्हणून मोठ्या मनाने बाळासाहेब बंडगर मामा उठले आणि त्यांनी खुर्ची दिली.
पहा हा संपूर्ण व्हिडीओ👇👇👇👇


















