सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दलित वस्ती अर्थात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेच्या टेबलची मागील वर्षभरापासून चर्चा आहे. या योजनेला तब्बल 50 कोटीहून अधिक निधी वर्षाला येतो त्यामुळे या टेबलला महत्व आहे. हा टेबल मिळण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत असतात. हा टेबल मिळविण्यात स्वाती गायकवाड या महिला विस्तार अधिकाऱ्याला यश आले आहे. हा टेबल द्यायचा कुणाला हा गुंता मागील अनेक दिवसांपासून होता. तो अखेर सुटला असल्याचे समजले.
यापूर्वी आबा मेटकरी यांनी हा टेबल बरेच वर्षे सांभाळला होता, त्यांच्या हेकेखोर स्वभावामुळे सभापतींनी तक्रार केल्यानंतर त्यांचा टेबल काढून तो स्वामी यांना देण्यात आला. स्वामी यांनीही सुमारे तीन वर्षाहून अधिक काळ हा टेबल सांभाळला. परंतु त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने तो टेबल शिवानंद मगे यांच्याकडे आला. मगे यांनी रिस्क घेतली नाही केवळ नियंत्रण ठेवले. तेव्हापासून स्वाती गायकवाड या महिला अधिकाऱ्याला या कामाचा वर्षभरापासून अनुभव आहे.
नंतर मगे यांची बदली झाली त्यामुळे हा टेबल द्यायचा कुणाला असा विषय होता, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी याप्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याशी चर्चा करून शेवटी याची जबाबदारी गायकवाड यांच्याकडे दिल्याचे सांगण्यात आले. या योजनेची कामे देताना टक्केवारीचा खेळ चालतो. म्हणूनच टेबलच्या आजूबाजूला कामे घेणाऱ्यांची गर्दी असते, टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला स्वतः सांभाळून काम करत अधिकारी, पदाधिकाऱ्यांची मर्जी सांभाळावी लागते. स्वामी यांना कामाचे 3 टक्के प्रमाणे पैसे घेतानाच रंगेहाथ पकडण्यात आले होते. आता समाज कल्याणच्या दलित वस्तीचा कारभार कशा पध्दतीने चालणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.