सोलापूर जिल्हा परिषदेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे 8 आमदार आणि दोन खासदार यांनी ठरवल्याप्रमाणे सोमवारी आमदार प्रशांत परिचारक माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी हे जिल्हा परिषदेत आले होते, आमदार प्रशांत परिचारक हे सकाळी लवकरच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या केबिनमध्ये बसले होते त्यांच्यासोबत वसंतनाना देशमुख, बाळासाहेब देशमुख हे दोन समर्थक उपस्थित होते. त्यानंतर काही वेळाने माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख हे आले थोड्या वेळाने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे जिल्हा परिषद मध्ये आगमन झाले. यावेळी पत्रकारांनी जिल्हा परिषदेची स्थायी समिती व सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने न घेता खुल्या जागेत घेण्याबाबत चर्चा केली आता सोलापूर शहर संपूर्ण अनलॉक झाले आहे त्यामुळे सभा घेण्यास काही हरकत नाही असे आमदार परिचारक म्हणाले, त्यावर अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी आपणाला परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. विधानसभेच्या आमदारांचे अधिवेशन होते तर जिल्हा परिषदेची स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा का होत नाही असा सवाल परिचारक यांनी उपस्थित केला. अध्यक्ष तुम्ही तुमच्या पत्रावर जिल्हाधिकारी तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री यांना जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खुल्या जागेत देण्याची मागणी करा त्या पत्रावर आम्ही आमच्या आठ आमदारांच्या सह्या करतो अशी परिचारक यांनी सूचना केली. सर्व सदस्यांच्या 48 तास पूर्वीचा कोरोना तपासणी रिपोर्ट बंधनकारक ठेवा असे ही परिचारक म्हणाले. जिल्हा परिषदेमध्ये जलसंधारण विभागाच्या निधी वाटपात होत असलेल्या गोंधळावरून अनेक सदस्य आमदार नाराज आहेत, जिल्हा नियोजन समितीकडून येणाऱ्या निधीवर सर्व अधिकार हे जिल्हा परिषद अध्यक्षांचे असतात असे असतानाही या निधी वाटपामध्ये मनमानी सुरू असल्याचे कुजबुज ऐकण्यास मिळते, यावर आमदार परिचारक यांनी अध्यक्ष तुम्ही थोडेसे आक्रमक व्हा तुम्हाला काही गैर आढळल्यास अजिबात फाइलवर सही करू नका, सर्व सदस्य तसेच सर्व सभापतींना समान न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका ठेवा अशा सूचना परिचारक यांनी अध्यक्ष कांबळे यांना केल्या.