कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वानाच शहाणे केले. पहिली लाट ज्येष्ठांसाठी, दुसरी लाट युवा वर्गासाठी तर तिसरी लाट आता 0 तर 18 वयोगटातील असल्याने पालकांमध्ये भीती वाढली आहे, याच पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सभापती, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल जाधव, यांची बैठक घेतली, या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे सुद्धा जॉईन होते. जिल्ह्यातील बालकांचे सर्व्हेक्षण व्हावे, आजारी बालके, त्यांचे आजार याची माहिती घ्यावी, जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ त्यांचे दवाखाने अद्ययावत ठेवावे, तसेच लसीकरण वाढवून केंद्र वाढवावे अशा विविध सूचना पदाधिकारी व सदस्यांनी केल्या, ग्रामीण भागात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सातपुते यांनी केले.
बैठकीनंतर सीईओ स्वामी यांनी माहिती दिली, तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करण्यात येणार आहेत, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कायमस्वरूपी सुसज्ज करण्याचा विचार असून सर्व केंद्रांचा सर्व्हे करणार असून पीएचसी मध्ये लागणारे साहित्य, इमारत खोल्या, त्याला लागणारा निधी तसेच लहान बालकांसाठी वार्ड, लागणारे बेड, मेडिकल साहित्य असे परिपूर्ण “ब्लु प्रिंट” तयार करून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले.
मंगळवारी जिल्ह्यातील 1029 ग्रामपंचायत मध्ये ग्राम दक्षता समितीची बैठक घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आदेश काढून गाव स्तरावर दक्षता समिती स्थापन केली होती. त्या अनुषंगाने ही महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले.

















