जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत घर , शाळा , अंगणवाडी , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन बाबतच्या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) गोरख शेलार ,शिक्षणाधिकारी संजय राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.कटकधोंड , शाखा अभियंता पी.एस.हरिसंगम यांच्यासह सर्व उपअभियंता, शाखा अभियंता व कर्मचारी आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले , जल जीवन मिशन अंतर्गत १०० दिवसांमध्ये जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीमध्ये नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे होते पण सदरचे उर्वरित काम हे कसल्याही परिस्थितीत येत्या जानेवारी अखेर शंभर टक्के पूर्ण करावयाचे आहे.सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करुन तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष काम त्वरित सुरू करण्याचे आवाहनही करण्यात आले.जिल्ह्यात घरोघरी नळ जोडणीचे १ लाख ८१ हजार इतके उद्दिष्ट आहे.त्यामधील ८० हजार इतके शिल्लक उद्दिष्ट येत्या मार्च अखेर पूर्ण करणे आवश्यक आहे.तसेच १८४ इतक्या प्रगती पथावरील प्रस्तावित नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करणे , उपविभागस्तरावरील नळ जोडणी करण्याचे २०० इतके उद्दिष्ट आणि ४७७ इतक्या सुधारणात्मक कामांचेही अंदाजपत्रके येत्या मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या.