सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूरात पदभार घेतल्यानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी माझे गाव,कोरोनामुक्त गाव ही अभिनव संकल्पना राबवली. त्यानंतर गाव तिथे कोविड केअर सेंटर, प्रभातफेरी, गावकऱ्यांना शपथ, ग्रामस्तरीय समित्यांच्या एकाच दिवशी बैठका यासारख्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून गाव कोरोनामुक्त करण्याचा अथक प्रयत्न करण्यात आला. हा उपक्रम गावकऱ्याकडून राबवला गेला. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्तरीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतला. गावकऱ्यांनी सुध्दा त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 700 च्या जवळपास गावे कोरोनामुक्त राहिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या उपक्रमाचे कौतूक केले दोन सरपंचांच्या नावाचा उल्लेख केला, आणि राज्यात कोरोनामुक्त गाव ही योजनाच सुरू केली. मुख्यमंत्री ठाकरेंनी स्वतःच्या फेसबुकवर सीईओ दिलीप स्वामी यांचा फोटो ठेवून अभिनंदन केले आहे.
अक्कलकोट ११७, बार्शी ८५, करमाळा ६६, माढा ७२, माळशिरस २५. मंगळवेढा ६६. मोहोळ ६३, पंढरपूर २६, सांगोला ५१, उत्तर सोलापूर – ३१. दक्षिण सोलापूर ७६ अशी गावं कोरोनामुक्त झाली आहेत.
जिल्ह्यातील या गावाने उत्तम कामगिरी केल्याने त्याचा यथोचित सत्कार करुन त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक कृषि अधिक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यासह त्यांच्या अधिनस्त अधिकारी यांच्या हस्ते काही निवडक गावात प्रातिनिधीक स्वरुपात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकऱ्यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यात जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी व त्यांच्या अधिनस्त उप जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांचे सर्व विभाग प्रमुख, पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक व उप अधिक्षक तसेच जिल्हा कृषि अधिक्षक यांनी स्वतः व त्यांच्या उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या हस्ते गावात जाऊन सत्कार करतील.

















