सोलापूर : उत्तर प्रदेशातील शेतकरी लखिमपुर खेरी या गावात आंदोलन करताना त्यांना केंद्रीय मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रकार घडला या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महा विकास आघाडी सरकारने सोमवार 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली व त्या बंदला सोलापूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, लतीफ तांबोळी, प्रल्हाद काशीद, मनोज साठे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे जिल्हा नियोजन भवन इमारतीत होते त्या ठिकाणी जाऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलयं,
उत्तर भारतातील शेतकरी गेली अनेक महीने आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करून आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु वेळोवेळी हे आंदोलन भाजपा सरकारतर्फे तर्फे दाबण्याचा, भरकटविण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू त्यामध्ये त्यांना पूर्णतः यश आलेले नाही. शेतकरी आंदोलन साम, दाम, दंड, भेद वापरन देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांनाच संपविण्याचा घाट आता भाजप सरकारने चालविला आहे.
उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून मारण्याच प्रकार हा अत्यंत निंदनीय व तीव्र चीड आणणारा आहे. भारत कृषिप्रधान देश असताना या देशात शेतकऱ्याला अशी वागणूक ? अशावेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असून या निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून आम्ही सोमवार, दि. ११ ऑक्टोबर, २०२१ रोजी ” महाराष्ट्र बंद ” पाळून केंद्र सरकारच्या या विक्षिप्त कृतीचा निषेध करत आहोत.


















