सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कार्यक्रम सहाय्यक नागेश चौधरी या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्ती करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईचे सहसंचालक सुभाष बोरकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केल्या आहेत.
सोलापूर जिल्हयातील स्थानिक समाज कार्यकर्ता जावेद लालू पटेल यांनी संदर्भ क. १ अन्वये नागेश चौधरी, कार्यक्रम सहाय्यक, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याविरुध्द तक्रार या कार्यालयास दाखल केली होती. सदर तक्रारीमध्ये नागेश चौधरी, कार्यक्रम सहाय्यक (DEO) यांना सेवेतून कार्यमुक्त करुन पुन्हा सेवेत समावून घेण्यात आले आहे असे नमुद करणेत आले होते. सदर प्रकरणी तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे राज्यस्तरावरुन सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी श्री. नागेश चौधरी (कार्यक्रम सहाय्यक), जिल्हा परिषद, सोलापूर यांचे दि.०३/०७/२०१८ रोजीच्या आदेशान्वये दि. ०४/०७/२०१८ पासून सेवा समाप्त केली. तद्नंतर दि. ०४/०७/२०१८ ते दि. १३/०८/२०१८ या कालावधीत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून नविन नियुक्ती आदेश दि. १४/०८/२०१८ रोजी निर्गमित करुन रु.९६००/- या वेतनावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे पदस्थापना देण्यात आली. तसेच दि. १६/१०/२०१८ रोजीच्या
आदेशान्वये वेतन संरक्षित करुन रु.१८७७८/- या वेतनावर सुधारीत पुर्ननियुक्ती आदेश निर्गमित केल्याचे दिसून आलेले आहे.
नागेश चौधरी यांची सेवा समाप्तीची नस्ती गहाळ झाल्याबाबतची तपासणी केली असता यापुर्वी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी सदरचे आदेश जिल्हा परिषद कार्यालयाकडून काढल्याचे कळविले होते. परंतु तपासणीअंती सदरचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांचे कार्यालयाकडून निर्गमित झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.
संदर्भ क्र. ६ च्या परिपत्रकाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून कोणत्याही संस्थास्तरावरुन एखादया कर्मचा-याच्या अकार्यक्षमता / अनियमिततेच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आल्या असतील तर त्या कर्मचा-याचा यापुढे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोणत्याही पदाकरीता विचार केला जाणार नाही व सदर कर्मचा-यास यापुढे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करण्याची संधी देण्यात येऊ नये असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी संबंधीत कर्मचा-याच्या बाबतीत थेट नियुक्ती करीता विहित कार्यपध्दतीचा अवलंब न करता त्यास नियुक्ती आदेश निर्गमित केल्याचे दिसून आलेले आहे.
आपणास कळविण्यात येते की, श्री नागेश चौधरी, कार्यक्रम सहाय्यक यांच्या सेवा समाप्तीची सर्व कागदपत्रे गहाळ झालेले असून सदर गहाळ झालेल्या नस्तीची फेरचौकशी जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर यांचे मार्फत करुन एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्यात यावा.
तसेच सदर कंञाटी कर्मचा-याचे नियुक्ती प्राधिकारी आपण असल्यामुळे सदर प्रकरणी नागेश चौधरी, कार्यक्रम सहाय्यक यांना नियमबाहयरित्या देण्यात आलेली थेट नियुक्ती आदेश रद्द करुन त्यांचे सेवा समाप्तीचे आदेश निर्गमित करण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करणेत यावा.