सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे गुरुवारी अचानक जिल्हा परिषदेमध्ये आले, त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयात तासभर चर्चा केली. नक्की जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेमध्ये कशासाठी आले होते याची चर्चा मात्र जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू झाली. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पत्रकारांनी माहिती घेतली असता समजले की,
कायम सिईओ स्वामी हे बैठकांसाठी कायम जिल्हाधिकारी कार्यालयात जातात मात्र स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये येतो असा मॅसेज दिला होता, त्यामुळे ते आले तासभर आमच्यात वेगवेगळ्या विषयावर गप्पा झाल्या. याच दरम्यान राज्याचे माजी मुख्य सचिव तथा राज्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून सीईओ दिलीप स्वामींचे अभिनंदन केले आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर हे गुरुवारी जिल्हा परिषदेत आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी वर्षभराच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबवले आहेत या बाबत जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले आणि काही उपक्रम राज्य सरकारकडे पाठवता येतील का यावर चर्चा झाली अशी माहिती स्वामी यांनी दिली.
क्षत्रिय यांनी जिल्हा परिषदेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, सोलापूर जिल्हा परिषदेने तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क कायद्याबाबत प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचे वर्णन या वार्षिक अहवालात पृष्ठ 107-108 वर केले आहे. मी त्याबद्दल माझे सर्वोच्च कौतुक रेकॉर्डवर ठेवू इच्छितो. कृपया नागरिकांना सार्वजनिक सेवा पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध वितरण सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणे सुरू ठेवा. अभिनंदन पत्रा सोबत सेवा हक्क आयोगाच्या 2020-21 ची वार्षिक अहवालाची प्रत जोडलेली आहे.


















