सोलापूर : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या टाईमटेबल नुसार शंभर टक्के कामे पूर्ण झाली पाहिजेत. शंभर टक्के गुणवत्तेनुसार कामे झाली पाहिजेत. यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. शाळा आणि अंगणवाडी मधील नळ जोडल्याची तपासणी मी लावली आहे. त्यामध्ये कामचुकारपणा दिसल्यास मी प्रत्येकांना नोटिसा काढेन असा सज्जड दम मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित अभियंत्यांना भरला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जलजीवन मिशनच्या सर्वच कामांचा आढावा सोमवारी घेण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांच्यासह तीन तालुक्याचे गटविकास अधिकारी,सर्व पाणी पुरवठा उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सर्व कंत्राटदार उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी अभियंता कटकधोंड यांनी जिल्ह्यात 855 पैकी 24 कामे पूर्ण असून 605 कामे प्रगतीपथावर आहेत अशी माहिती दिली.
स्वामी म्हणाले, 95 टक्के चांगले काम झाली आहेत, 5 टक्के काम गैरप्रकार झाला असेल त्याचा मोठा गाजावाजा होतो, परंतु, चांगल्या कामांची सक्सेस स्टोरी करा, गावकऱ्यांच्या समस्या तिथेच सोडवा, कामे चालू आहेत तिथे बोर्ड लावा, अंतिम टप्प्यात असलेली आणि शिल्लक कामे लवकर पूर्ण करा, जलाजीवन मिशनच्या कमा बाबत् व्यापुढे कोणतीही तक्रार चालणार नाही अशा सूचना त्यांनी केल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी प्रत्येक कामांचा सविस्तर आढावा घेतला, काम करताना नेमकी अडचण कुठे येते? कामे का पूर्ण होत नाहीत? असे विविध कारणे कंत्राटदार यांच्या समक्ष जाणून घेतली. कामाची काही अडचण असेल तर थेट ग्रामसेवक यांना त्यांनी फोन लावण्यास भाग पाडले. कंत्राटदारांनी सुद्धा आपली कामे करताना येणाऱ्या समस्यांचा पाढा प्रशासनासमोर वाचला.

















