सोलापूर : राज्यामध्ये सात दिवस महसूल सप्ताह साजरा झाला. सोलापूर मध्ये महसूल सप्ताहाच्या समारोपाला मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी तथा राज्याचे सहकार निवडणूक आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील, माजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विद्यमान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात अनेक प्रशासकीय योग जुळून आले. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले जिल्हाधिकारी जगदीश पाटील त्यानंतर तब्बल साडेतीन वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ही गुरू शिष्याची जोडी उपस्थित होती. अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आपल्या भाषणामध्ये आपल्या प्रशासकीय कारकीर्दीचा योग सांगितला. ठोंबरे यांची जेव्हा पोस्टिंग झाली तेव्हा सोलापूरचे जिल्हाधिकारी जगदीश पाटील होते, त्यांच्या कार्यकाळात तुषार ठोंबरे हे भूसंपादन अधिकारी होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे असताना ठोंबरे यांना सहा महिन्याचा कार्यकाळ मिळाला तेव्हा त्यांच्या काळात महसूल भवनांचे उद्घाटन झाले आता तिसरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जगदीश पाटील हे माझे वरिष्ठ होते. माझा प्रोबेशनरी कार्यकाळ हा जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेला. सोलापूर जिल्ह्यामध्ये कामकाज करत असताना मी अनेक वेळा जगदीश पाटील यांचे मार्गदर्शन घेतल्याचेही सांगितले.
जगदीश पाटील यांनीही शंभरकर यांनी मला सन्मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केले असे सांगतानाच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक जर एकत्रित काम करतील तेव्हा निश्चितच विकासाला चालना मिळेल आणि प्रशासनाला कामकाज करताना कोणतीही अडचण येणार नाही असे सांगून एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला.