सोलापूर : प्रत्येक वडिलांना माझा मुलगा आपला राजकीय वारसा पुढे चालवावा अशी अपेक्षा असते. त्याचप्रमाणे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच सध्या काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचे चिरंजीव पृथ्वीराज नरोटे यांची वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.
काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली परंतु चेतन नरोटे हे पक्षासोबत एकनिष्ठ राहिले त्याचीच लॉटरी म्हणून सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदी चेतन नरोटे यांची निवड झाली. त्यानंतर मरगळलेल्या काँग्रेसमध्ये सध्या नवचैतन्य प्राप्त झाल्याचे चित्र असून शहराध्यक्ष नरोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसची वाटचाल महापालिकेच्या सत्तेचे दिशेने सुरू असल्याचे पाहायला मिळते.
नरोटे हे अध्यक्ष झाल्यापासून त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज नरोटे हे कायम त्यांच्या सोबत पाहायला मिळतात. वडिलांच्या प्रत्येक हावभावांवर पृथ्वीराज यांचे बारीक लक्ष असते. काँग्रेस भवनात होणाऱ्या सर्व बैठका, आंदोलने, मोर्चाला पृथ्वीराज उपस्थित असतात. आतापासूनच मुलाला राजकारणाचा चांगला अनुभव येत असल्याचे दिसून येते. खुद्द वडिलांकडूनच पृथ्वीराज हा राजकीय धडे घेत असल्याचे चित्र आहे.
चेतन नरोटे यांनी आपल्या मुलाच्या कार्याची सुरुवात सामाजिक उपक्रमातून केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात मूर्ती वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार भाई जगताप, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नेत्यांनी पृथ्वीराज नरोटे याच्या कार्याचे कौतुक केले आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.




















