सोलापूर (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय अहमदिया मुस्लिम जमात सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष अन्सार आली खान यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की, २६ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस भारताच्या प्रगतीचा पाया घालतो. ७४ वर्षांपूर्वी, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षांनी, १९५० मध्ये देशात लोकशाही व्यवस्थेची घोषणा झाली. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात मोठा प्रजासत्ताक देश असल्याचा भारताला अभिमान आहे. जिथे प्रत्येक जातीचे, वर्णाचे, धर्माचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात.
जमाअत अहमदियाचे पाचवे आणि वर्तमान आध्यात्मिक खलीफा, हजरत मिर्झा मसरूर अहमद यांनी २०१२ मध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना म्हटले होते की, हजरत मुहम्मद मुस्तफा स्वल्लल्लाहु अलैही वसल्लम यांनी ” देशावर प्रेम हा विश्वासाचा अविभाज्य भाग आहे” असे शिकवले आहे. म्हणूनच इस्लाम प्रत्येक अनुयायांकडून देशावर प्रेम शिकवतो. जमात अहमदिया भारतचे प्रवक्ते के. तारिक अहमद यांनी म्हटले आहे की जमात अहमदियाची ही शिकवण आहे की ईश्वर आणि इस्लामवर प्रेम करण्यासाठी, आपल्या मातृभूमीवर प्रेम करणे आवश्यक आहे. हे स्पष्ट आहे की देवावरील प्रेम आणि देशावरील प्रेम यात संघर्ष असू शकत नाही. म्हणून इस्लाम धर्मात हे अत्यावश्यक आहे की मुस्लिमाने आपल्या देशातून उच्च निष्ठेचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.