सोलापूर : सध्या राज्यातील पोलिस पाटीलांचे जाणीवपुर्वक थांबवलेले मानधन वाढ, दिवाळीच्या तोंडावरती प्रलंबित असलेले ३ ते ४ महिन्याचे मानधन, रखडलेला प्रवास भत्ता असे असताना दुसऱ्या बाजुला प्रशासनातील गावस्तरावरती कार्यरत असणाऱ्या कोतवाल, आशा सेविका, गट प्रर्वतक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या सर्व घटकांना मानधन वाढ करुन दिवाळी बोनस दिलेला आहे. परंतू गाव स्तरावरती पुढाकाराने कार्यरत असणाऱ्या पोलिस पाटील या सर्व गोष्टी पासून वंचित राहिलेला आहे.
या निषेर्धात पोलीस पाटील संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष विजय मुकुंद वाघमारे यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
१) पोलिस पाटील यांचे मानधन ६५०० वरुन २०००० रुपये करण्यात यावे.
२) पोलिस पाटील यांचे नुतनीकरण कायमस्वरुपी बंद करण्यात यावे.
३) पोलिस पाटील यांचा प्रवास भत्ता दुप्पट करण्यात यावा.
४) पोलिस पाटील यांचे वयोमर्यादा ६० वर्षावरुन ६५ वर्ष करण्यात यावे.
५) पोलिस पाटील यांना सेवानिवृत्ती नंतर एक रक्कमी २० लाख रुपये देण्यात यावे.
अशा त्यांच्या मागण्या आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते शंतनू गायकवाड यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून पाठिंबा दिला तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रशांत गोणेवार महिला आघाडीच्या शहराध्यक्ष पल्लवी सुरवसे व ट्रान्सपोर्ट व कामगार युनियनच्या वतीने आपला पाठिंबा देण्यात आला आहे.