सोलापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे, ही बाब लक्षात घेऊन तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथिल अॅड. वसंत दत्तू वडणे यांच्या स्मरणार्थ क्रांती ग्रुपतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ५० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन रक्तदान केले.
कुंभारी येथील नालंदा बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. त्यानंतर स्मृतिशेष ऍड वसंत दत्तू वडणे यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्मृतिशेष अॅड. वसंत दत्तू वडणे यांच्याविषयी भावनिक मनोगत व्यक्त करताना, सामाजिक कार्यकर्ते रुबाब पठाण यांनी आपल्या प्रास्ताविकात, त्यांच्या आठवणीला उजाळा दिला. त्यानंतर रक्तदान कार्यक्रमास सुरुवात आली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत ५० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करीत या शिबिरात आपला सहभाग नोंदला.रक्त संकलनासाठी मेडिकेअर ब्लड बँक, सोलापूर यांच्या डॉक्टर्स- कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
संपूर्ण शिबिरदारम्यान शिस्त व कोरोनाबाबतीत शासनाच्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी सर्व रक्तदात्यांना मेडिकेअर ब्लड बँकेच्यावतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वडणे यांनी केले.
यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजक क्रांती ग्रुप, कुंभारी तसेच दिलपाक प्रतिष्ठानचे सदस्य-ग्रामस्थ उपस्थित होते.


















