सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी धर्मराज काडादी यांनी आपल्या गंगा निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले 2014 साली महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून जाणीवपूर्वक कारखान्याच्या चिमणीचा विषय पुढे आणून त्रास दिला जात आहे. आता चिमणी पाडली परंतु जोपर्यंत दुसरी चिमणी उभी राहत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू होणे अशक्य आहे. मात्र हजारो कर्मचारी आणि सभासद शेतकऱ्यांचा विचार करून नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करता येतो का हे पाहून कारखाना लवकरच सुरू करण्यासाठी माझा प्रयत्न राहील अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी पत्रकारांनी आता राजकारणात उतरणार का? असा थेट प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना काडादी म्हणाले, सर्व सभासदांची, जेष्ठ सल्लागारांशी, राजकीय नेत्यांची चर्चा करून निर्णय घेईल परंतु यापुढे चांगला कारखाना पुन्हा चालवून दाखवणे हेच माझे विरोधकांना उत्तर असेल. ते पुढे म्हणाले,माझा पिंड राजकारणी नाही, मात्र परिस्थिती तशी निर्माण झाली आहे वेळ आल्यानंतर राजकारणात ही उतरेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील दोन ते तीन दिवसांमध्ये मी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यांनीही संबंधितांना फोन करून सांगितले. त्यांनी फार प्रयत्न केला, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली परंतु हा विषय उच्च न्यायालयाचा असल्याने त्यामध्ये मला हस्तक्षेप करता येणार नाही असे सांगून त्यांनी टाळले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते भेटले नाहीत.

















