सोलापूर : उत्तर तालुक्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे मराठा समाजातील ज्येष्ठ म्हणुन ओळखले जातात. परंतू, त्यांनी सामाजिक सलोखा राखून विकास कामात आपले वडाळा हे गाव राज्यात आघाडीवर आणले आहे. त्या वडाळा गावात आजपर्यंत भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फोटोला हार घालवण्याचे करण्यात येत होती. आता काका यांनी वडाळा गावात डॉ. आंबेडकर यांचा सहा फुटी उंचीचा पूर्ण कृती पुतळा उभा करण्याचा निर्धार केला आहे.
पुतळा उभारणीसाठी साठे कुटुंबीयांकडून एक लाख रुपयाची देणगी देण्यात आली आहे. वडाळा ग्रामपंचायतीतर्फे एक लाख रुपये देण्यात येणार आहेत .तर पुतळा उभारणीसाठी निधीबाबत आवाहन केल्यानंतर गावातील दानशूर नागरिकांनी आजपर्यंत अडीच लाखाचा निधी दिला आहे. अशा प्रकारे पुतळा उभारणीसाठी साडेचार लाख रुपये जमा झाले असून पुतळा उभारणीचा खर्च साडेआठ लाख रुपये आहे. उर्वरित रक्कम ही लवकरच उभी करण्यात येणार असल्याचे साठे यांनी सांगितले.
भीम अनुयायांसाठी गर्वाची बाब : गायकवाड
वडाळा गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेसहा फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्याची घोषणा बळीराम साठे यांनी १४ फेब्रुवारी रोजी केली आहे. त्या दृष्टिकोनातून निधी संकलनाचे काम सध्या सुरू आहे. सामाजिक सलोखा राखणाऱ्या वडाळा गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणी ही बाब भीम अनुयायांसाठी आनंददायी आहे. अशी प्रतिक्रिया या संदर्भात बोलताना वडाळयाचे माजी सरपंच प्रभाकर गायकवाड यांनी दिली.



















