सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटलांच्या कामांचा जोरदार सपाटा होता, त्यामुळे जिल्ह्याच्या मालकांमध्ये कमालाची नाराजी वाढली, यातच उमेश रावांना जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळणार असं समजल्यावर तर अनेकांचे डोळे वटारले, आता आलेलं पोरगं आम्हाला शिकवणार का?आम्ही याच्या हाताखाली काम करायचे का? असे म्हणून सूत्र फिरली, जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते असलेले काका साठे यांना कधी संधी मिळायची म्हणून त्यांच नाव पुढं करण्यात आलं .काका ज्येष्ठ असल्यानं त्यांना न्याय मिळाला. ते जिल्हाध्यक्ष झाले , काका मात्र आपले राजन मालक, आमदार यशवंत तात्या यांनाच घेऊन काम करतात.असा कायम आरोप होतो.
राज्यात सत्ता असल्याने आणि त्यात उमेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अतिशय जवळचे असल्याने जिल्ह्यात वट बसवला. काम होत असल्याने अनेक जण त्यांच्या मागं फिरू लागले. राज्याचं प्रवक्ते पद, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अशी अनेक पदे उमेशरावांकडे आहेत. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आपोआपच उमेश पाटील यांच नाव माध्यमातून पुढं येऊ लागले.
अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील यांनी नागरिकांचा जनता दरबार हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केली. अक्कलकोट मध्ये कार्यक्रम यशस्वी झाला, तो पुढे दक्षिण सोलापूर तालुक्यात आला, या तालुक्यात कार्यक्रम जोरात सुरू असतानाच त्याच तालुक्याच्या अध्यक्षाला काका साठे यांनी तडकाफडकी पदावरून काढून दुसऱ्याला अध्यक्ष केले, ही माहिती मिळताच उमेश पाटलांनी आपल्या अधिकारात तालुका अध्यक्ष निवडीला स्थगिती दिली. मात्र काकांनी बिपीन करजोळे हेच अध्यक्ष राहतील असे ठणकावून सांगत कार्यकारी अध्यक्ष पद पक्षाच्या घटनेत नसल्याचे सांगून उमेश पाटलांना शह दिला.
हा वाद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत गेला मात्र या दोन नेत्यांनी पाटलांना शांत केले, सोलापूरला आल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपण जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नाही, दिले तरी घेणार नाही अशी भूमिका स्पष्ट करत काका साठे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असे सांगून वादावर पडदा टाकला, दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या बैठकीला काकांच्या कार्यकर्त्यांनी पाटलांना बोलावले नसले तरी ते गेले तिथे जोरदार भाषण ठोकलं. त्यानंतर काका साठे यांचा ही बहुतेक उमेश यांच्या बद्दलचा गैरसमज दूर झाला असावा.
मंगळवारी जिल्हा परिषदेत काकांना पत्रकार भेटलं असता आणि उमेश पाटील यांचा पुन्हा विषय निघाला त्यांनी उमेश पाटलांनी शहाणं व्हावं, आता आम्ही म्हातारे झालो, त्यांना पुढं चांगलं करियर आहे, असं म्हणून शांत राहून काम करण्याचा एक प्रकारे सल्लाच दिला.


















