सोलापूर : मनोज उर्फ प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी. काँग्रेस पक्षाच्या फादर बॉडीचा प्रदेश प्रवक्ता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अतिशय मर्जितला कार्यकर्ता. रविवारी काँग्रेस पक्षाचा निर्धार महामेळावा संपन्न झाला. त्या कार्यक्रमात काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे व वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व दिसून आले. त्या कार्यक्रमात मनोज कुलकर्णी हा कार्यकर्ता कुठेही दिसला नाही.
याच कार्यक्रमात राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते, पहिल्या रांगेत उजव्या बाजूला जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या रांगेत वरिष्ठ नेत्यांची मोठी गर्दी असल्याने जिल्हाध्यक्षांना शेवटची खुर्ची मिळाली. दरम्यान उज्वला शिंदे यांना स्टेजवर बोलवण्यात आल्याने त्यांना खुर्ची देण्यासाठी चढाओढ निर्माण झाली होती. याचवेळी धवलसिंह मोहिते पाटील यांनी खुर्ची सोडून भर कार्यक्रमातून निघून गेल्याचे दिसून आलं.
अधिक माहिती घेतली असता समजले की, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांना खुर्ची देण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील उठले होते आणि आता बसायचे कुठे असे म्हणून त्यांनी सभागृह सोडले. परंतु भर कार्यक्रमातून जिल्हाध्यक्षांनी उठून जाणे हे पक्षाच्या शिस्तीला शोभत नाही असा सूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे आणि याची दखल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे बोलले जाते.
रविवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोलापुरी मुक्कामी होते. सकाळच्या सुमारास त्यांच्यासोबत नाश्ता करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हतुरे, प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चकोते, आमदार भाई जगताप यांची एकाच टेबलवर उपस्थिती दिसून आली. काका कुलकर्णी यांना पटोले यांनी स्पेशली फोन करून तू सकाळी नाश्त्याला ये असे म्हणून बोलवून घेतल्याचे समजले. त्याचवेळी कायम नाना पटोले यांच्या सोबत दिसणारे विजयकुमार हत्तूरे व मनोज कुलकर्णी यांनी धवलसिंहावरील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पटोले यांच्यासमोर केला असल्याची चर्चा आहे.

















