20 नोव्हेंबर रोजी आमदार प्रणिती शिंदे या अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली होती, त्या पार्श्वभूमीवर 22 नोव्हेंबर सोमवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवनात सर्व इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
या बैठकीत सोलापूर शहर युवक अध्यक्षपदासाठी गणेश डोंगरे यांना फायनल करण्यात आले आहे जिल्हाध्यक्षपदासाठी पंढरपूरचे सुनंजय पवार यांना मतदान करण्याच्या सूचना करण्यात आल्यात. आमदार ताईच्या शहर मध्य मतदार संघासाठी वाहिद विजापुरे याला पसंती देण्यात आली. श्रीकांत वाडेकर याला महापालिकेची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहर उत्तर साठी महेश लोंढे आणि शरद गुमटे यांच्यात स्पर्धा होती मात्र शरद गोमटे याला एनएसयुआय संघटनेत मोठी संधी देण्याचे आश्वासन मिळाल्याने महेश लोंढे यांचा मार्ग मोकळा झाला. दक्षिण विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपद व प्रदेश सरचिटणीस पदावर प्रणिती शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला नाही तो गुलदस्त्यात ठेवलाय. प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुणाल राऊत व शरण पाटील यांना सपोर्ट करण्याच्या सूचना केल्या. मोहोळसाठी आरिफ पठाण व अक्कलकोट साठी बाबा पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना केल्या.
राज्यात प्रदेश युवक मध्ये सध्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत व सत्यजित तांबे यांच्यात गट निर्माण झाला आहे, त्यातच प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील हे सुध्दा युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत. प्रदेश सरचिटणीस पदासाठी मनोज कुलकर्णी, सुमित भोसले, प्रवीण जाधव, ओंकार गायकवाड, पद्मसिंह शिवशेट्टी ही युवा मंडळी उमेदवार आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघावर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचं लक्ष असल्याने ते युवकअध्यक्ष पद आमदार ताईंनी गुलदस्त्यात ठेवल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक इच्छुक असलेला अर्जुन साळवे याची संधी गेल्याने त्याचा हिरमोड झाला.


















