माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.
एकनाथ गायकवाड यांची राजकीय कारकीर्द
कनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.
जायंट किलर ठरले
एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.


















