सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत काही तालुक्यामधील निवडी या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना विश्वासात न घेता केल्यामुळे सदर निवडींना प्रदेश काँग्रेसने स्थगिती दिलेली होती त्या स्थगिती आदेशाचे जिल्हा काँग्रेसकडे निर्गमित झालेले पत्र प्रत्यक्षात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी येथील टिळक भवन या मुख्यालयात सोलापूर जिल्ह्यातून गेलेल्या शिष्टमंडळाला प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांच्याकडून दाखवण्यात आले.
मागील आठवड्यात पुणे येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या सह प्रभारी सोनल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून स्थगिती नाही त्यामुळे प्रदेश काँग्रेसने जाहीर केलेली यादी हीच अंतिम आहे अशा अर्थाच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित झाल्यामुळे काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजीला उधान आलेले होते. याबाबत सोलापूर येथून मोठ्या संख्येने आलेल्या शिष्टमंडळाने सकाळी प्रथम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या पाली हिल येथील निवासस्थानी भेट घेऊन जिल्हाध्यक्षांच्या गटबाजी मुळे पक्षांतर्गत स्नेह न राहता वादंग तयार जात असल्याची कैफियत मांडली.
त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी येथे राज्याच्या सह प्रभारी सोनल पटेल यांची शिष्टमंडळाने भेट घेतली व जिल्ह्यात होत असणाऱ्या संघटनेमधील प्रतिकूल आणि वादाबाबत तक्रार केली. सोनल पटेल आणि प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेऊन या सर्व तक्रारीचे मूळ हे सभासद नोंदणीनंतर प्रदेशच्या पत्रावर निवडलेले पदाधिकारी आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरून होत असणाऱ्या प्रक्रियेमध्ये नेमलेल्या व्यक्तींनी स्थानिक बाबी पडताळून न पाहता व प्रत्येक ब्लॉकला भेट न देता निवडणूक प्रक्रिया आणि कसलाही सोपस्कार न करता केली आहे असे चित्र तयार केल्याचे निदर्शनास आले.
या निवडीना सुशीलकुमार शिंदे यांची अनुकूलता आहे असे गृहीत धरून या निवडी प्रदेश पातळीवरून झाल्याचे जिल्हाध्यक्ष जरी सांगत असले तरी झालेल्या प्रक्रियेमध्ये गटबाजीला खतपाणी घातले जात आहे असे निदर्शनाला आले. याबाबत नव्या निवडीला सुशीलकुमार शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे स्थगिती आहे किंवा नाही याबाबत शिष्टमंडळाने खुलासा मागितला असता प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी रेकोर्डचे पत्र दाखवले त्यानंतर कसलाही नवा आदेश झाला नाही याचाही खुलासा केला. सद्य स्थितीत गटबाजी पक्षाला परवडणारी नसून तात्काळ वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप न झाल्यास जिल्ह्यातील काँग्रेस रसातळाला जाईल असे मत उपस्थित सर्वांनी व्यक्त केले.
केवळ सभासद नोंदणी हा ब्लॉक अध्यक्ष निवडीचा निकष असू शकत नाही. सभासद हे पक्षाचे असतात कोणी सभासद केले त्यावरून तो नेता होतो असे नसतो. त्यामुळे झालेल्या प्रक्रियेमध्ये काही दोष झालेले आहेत सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करून स्थगिती नंतर नेमका काय निर्णय घ्यायचा हे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ठरवतील असे सोनल पटेल आणि प्रमोद मोरे यांनी स्पष्ट केले. मात्र नव्या निवडीला स्थगिती आहे हे नक्की असून त्यामुळे जुनेच ब्लॉक अध्यक्ष हेच कायम आहेत हे स्पष्ट झाले आहे.




















