सोलापूर : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पुण्यामध्ये संपन्न झाली. ही बैठक सोलापूर जिल्ह्यासाठी वादळी ठरली. शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्षांची मागणी केल्याने बैठकीचा नूर बदलून गेला.
या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जिल्ह्याचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहराध्यक्ष चेतन नरोटे, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शहर आणि जिल्ह्याला मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले, आपल्याला सोलापूर लोकसभा यंदा काहीही करून जिंकायची आहे. एकूणच राज्यातील वातावरण पाहता सोलापूरचे दोन्ही देशमुख पडतील असा दावा करताना ज्यांनी चिमणी पाडली त्यांना आपण पाडायचे आहे. त्यामुळे काँग्रेसचे बूथ यंत्रणा सक्षम करा, पक्ष संघटना बांधणीवर भर द्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रास्ताविकात सोलापूरच्या कामकाजाचा आढावा सांगितला. सोलापूरची लोकसभा जिंकायची असेल तर दोन जिल्हाध्यक्ष करणे गरजेचे आहे. भारतीय जनता पार्टीला करावे लागले, शिवसेनेचे चार आहेत तर आपण का करू नये. माढा व सोलापूर असे लोकसभा मतदारसंघ निहाय जिल्हाध्यक्ष करा त्यामुळे कार्यकर्त्यांना काम करायला वाव मिळेल असे सांगतानाच मंगळवेढा हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा, शहर उत्तर हा आपलाच आहे. त्यामुळे उत्तर ची मागणी ही आपल्याकडे करावी. तरच पक्ष त्या भागात मजबूत होईल अशी भूमिका मांडली.
नरोटे यांचाच धागा काही नेत्यांनी धरला, यावर येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याची भूमिका पटोले यांनी मांडल्याच सांगण्यात आले.