सोलापूर : ग्रामीण भागांमध्ये सध्या ई पीक पाहणी कार्यक्रम सूरु आहे, जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा विषय असल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासन यासाठी कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही शेतांमध्ये जाऊन ई पीक पाहणी केली, त्यामुळे आपला प्रमुख आल्याने प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी त्यांचे मनोबल वाढले आहे.
दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात शाळा जरी बंद असल्या तरी या शाळा लोकसहभागातून स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केला आहे त्याला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ही संकल्पनासुद्धा आता राज्य सरकार राबवणार आहे, स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे जिल्ह्यामध्ये फिरून शाळेची पाहणी करत आहेत केलेल्या कामाचे आपल्या प्रमुखाकडून कौतुक झाल्याने शिक्षकांचा ऊर भरून येत आहे.
तिसरीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील हातभट्टी हद्दपार करण्याचा विडा उचलला असून त्यांनी ऑपरेशन परिवर्तन सुरू केले आहे.त्या स्वतः फिल्डवर जाऊन हातभट्ट्या उद्ध्वस्त करत आहेत तांड्यावरील युवकांमध्ये जनजागृती केली जात आहे शिक्षणाचे महत्व सांगून इतर उद्योग व व्यवसायाकडे वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एसपी सातपुते यांचा हा उपक्रम निश्चितच परिवर्तनाकडे नेणारा आहे.
सोलापूर जिल्ह्याचे हे तीन प्रमुख अधिकारी ग्राउंडवर असताना शहर सध्या डेंगूच्या आजाराने त्रस्त आहे. महापालिका आयुक्त म्हणून पी शिवशंकर यांची जबाबदारी असताना ते फिल्डवर कुठेही दिसत नाहीत काही ठराविक अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली असून उद्या काय झालं तरी खापर त्यांच्याच डोक्यावर फुटावे अशा भावनेतून सध्या महापालिका आयुक्तांचा कारभार सुरू असल्याची चर्चा महापालिकेत आहे.
शिवशंकर हे फिल्डवर क्वचितच दिसतात पदाधिकारी आमदारांची मर्जी राखण्यासाठी तेवढा त्यांचा दिखाऊपणा पाहायला मिळतो मात्र सध्या सोलापूर शहरांमध्ये डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी एक दिवसाचा ड्रायरन घेण्याची गरज आहे ते केवळ महापालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून शिवशंकर हेच करू शकतात यामध्ये सर्व महापालिकेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, त्या त्या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांची मदत घेऊन संपूर्ण एक दिवसाचा ड्रायरन शहरांमध्ये राबवण्याची गरज आहे. सर्व घरातील बिनकामाचे साचलेले पाणी रिकामे करून कोरडा दिवस पाळण्याची आवश्यकता असून लोकांमध्ये त्याबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करावी,त्यामुळे डेंग्यूवर कायमच्या उपाययोजना होऊन लोकांमध्ये जनजागृती होईल. डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी शिवशंकर हे आपला तिसरा डोळा कधी उघडतात याकडे शहराचं लक्ष लागले आहे.