सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव मधील एका कर्तृत्ववान मागासवर्गीय समाजाच्या महिलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याने त्या महिलेने तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने प्रथमच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये महिला व बाल विकास क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या दोन महिलांना यंदा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्याचे ठरवले. त्यानुसार गावात समितीद्वारे ही निवड करण्यात येणार होती. त्या पुरस्काराचे वितरण आज 31 मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी होत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव मधील सारिका नानासाहेब वाघमारे या 2014 पासून आपल्या गावात महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण घरगुती हिंसा प्रतिबंधक असे भरीव काम करत आल्या आहेत. गावातील अनेक महिलांना त्यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करून न्याय सुद्धा दिल्याचे पाहायला मिळाले. त्यांना ग्रामसेवकाने जाणीवपूर्वक या पुरस्कारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामसेवकाने उशिरा अर्ज दिला, अर्ज भरून देत असताना तारीख संपली म्हणून सांगण्यात आले. ही महिला पात्र असताना इतर महिलांची निवड करण्यात आली आहे.
पंचायत समितीमध्ये येऊन वाघमारे यांनी तक्रार केली परंतु त्यांची दखल घेतली नसल्याचे वाघमारे यांनी सांगितले. संबधित ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक आपणास पुरस्कारपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत असा थेट आरोप वाघमारे यांनी केला आहे. आता या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे काय निर्णय घेतात हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.



















