सोलापूर दि.10(जिमाका):- राज्य शासनाने मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याबाबत संपूर्ण राज्यात युद्धपातळीवर मोहीम सुरू केलेली आहे, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः प्रत्येक तहसील कार्यालयात जाऊन मराठा कुणबी पुरावे मदत कक्षास भेट देऊन कक्षाच्या वतीने तपासणी करत असलेल्या अभिलेखाची पाहणी करत आहेत. दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री साडेआठ वाजता जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील कक्षास भेट दिली असता तेथील अभिलेख शोध मोहिमेची माहिती घेतली. दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातील वीस सदस्यांनी सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत एकाच दिवसात 46 हजार 500 जुनी अभिलेखे तपासणी केली. या अभिलेखात मराठी भाषा व मोडी लिपी भाषेतून मराठा कुणबी नोंदणी आढळून येत आहेत. दक्षिण तहसील कार्यालयाने एकाच दिवसात 46 हजार पेक्षा जास्त महसुली अभिलेखाची तपासणी केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त करून दक्षिण तहसीलदार व त्यांच्या टीमचे कौतुक केले.
दक्षिण तहसील कार्यालयाने महसूल विभागाचे रेकॉर्ड, जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर, क, ड, ई पत्रक, सर्व्हे नंबर उतारे या अभिलेखाची तपासणी केली. यामध्ये मराठी तसेच मोडी लिपी मध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीच्या नोंदी आढळल्या आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख तपासणी पथकाला मराठा कुणबी नोंदी अभिलेखात कशा पद्धतीने तपासव्यात तसेच मोडी लिपीत मराठा कुणबी शब्द कशा पद्धतीने आहे याबाबत माहिती दिली. दक्षिण तहसील कार्यालयात नोंदी तपासणीचे काम चांगले सुरू असून जिल्ह्यात सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोंदीमध्ये मराठा कुणबी जातीच्या नोंदीचा अधिक गतीने व सूक्ष्मपणे शोध घ्यावा. तसेच नागरिकांनीही त्यांच्याकडे मराठा कुणबी नोंदी असलेली जुने अभिलेखे असतील तर त्याबाबत मदत कक्षास माहिती द्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, दक्षिण तहसीलचे तहसीलदार किरण जमदाडे, निवासी नायब तशिलदार राजाभाऊ भंडारे, नोडल अधिकारी नायब तहसीलदार दत्ता गायकवाड, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव व महसूल चे अन्य कर्मचारी उपस्थित होते.
*********