सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या मागील दोन ते तीन सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आणि महापालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे या दोघांमध्ये कायम तू तू मै मै झाल्याचं दिसून आलं. जिल्हा परिषदेच्या शाळा हद्दवाढ झाल्यानंतर त्या महापालिकेच्या भागांमध्ये आहेत त्या शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.
मात्र जिल्हा परिषद आपल्या हक्काची मालमत्ता महापालिकेला देण्यास तयार नाही. त्यामुळे हा विषय कायमच चर्चिला जातो. शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला जात नाही म्हणून आनंद चंदनशिवे यांची ओरड होती. त्यामुळेच उमेश पाटील आणि आनंद चंदनशिवे यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
एकमेकांमध्ये खडाजंगी सुद्धा झाली, चंदनशिवे इतके आक्रमक होते की त्यांनी उमेश पाटलांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते कायमच एकमेकांवर तोंडसुख घेत होते, एकमेकांचे चेहरे सुद्धा बघत नव्हते, दरम्यानच्या काळात वंचित बहुजन आघाडी मधून आनंद चंदनशिवे यांनी तोंड फिरवल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्कात आले.
संपर्क एवढा वाढला की भरणे मामांनी थेट आनंददादांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. बहुजन समाज पार्टी सोडल्यानंतर वंचित बहुजन मध्ये आलेल्या चंदनशिवे यांना तो ही पक्ष सोडल्यानंतर समोर दुसरा पक्ष नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेतील पॉवरफुल पक्ष असल्याने त्यांनी मनावर घेतले आता जवळजवळ आनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश निश्चित झालेला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गोडवे चंदनशिवे गात आहेत. भरणे मामांचा तर कौतुक किती करावं याला चंदनशिवे यांचा पारावार उरला नाही.
याच दरम्यान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. एकमेकावर तोंडसुख घेणारे आनंद चंदनशिवे आणि उमेश पाटील हे एकमेकांना आदराने सन्मानाने बोलत होते. आनंद चंदनशिवे यांनी तर उमेश पाटलांना “उमेश दादा” या शब्दात कौतुक केले तर उमेश पाटलांनी आनंद चंदनशिवे यांना आनंदजी असे म्हणून त्यांचा गौरव केला या सभेनंतर राजकारण आणि माणसं कशी बदलतात याचा प्रत्यय तिथे उपस्थित अनेकांना आला.याची चर्चा सुद्धा अधिकारी आणि नेत्यांमधून ऐकण्यास मिळाली.

















