सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमाला राज्यातून नावाजले गेले. लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून तब्बल 8 कोटींचा निधी उपलब्ध झाला जिल्ह्यातील अनेक शाळांचे रुपडे पालटले.
लॉकडाऊन मध्ये बंद असलेल्या शाळांचे चित्र पाहून सीईओ स्वामींसमोर सर्व शाळा स्वच्छ झाल्या पाहीजे ही संकल्पना समोर आली. सरकारचा एक रुपया सुद्धा खर्च न करता जिल्ह्यातील हजारो शाळा स्वच्छ व सुंदर झाल्या आहेत. या उपक्रमात उत्कृष्ट काम केलेल्या मुख्याध्यापकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी अडीच वाजता गौरवण्यात येणार आहे. तिथे जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहतील. प्रतिनिधित्व स्वरूपात काही जणांना मुंबईत गौरविण्यात येणार असून हा ऑनलाइन सोहळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न होईल.
अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व सभापती, विभाग प्रमुख उपस्थित असतील. जिल्हा परिषदेच्या फेसबुक व युट्यूब वर हा सोहळा लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.















