सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर त्यांनी मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले आहे. याप्रकरणी गुरुवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
उत्तर तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे बाजार समिती संचालक जितेंद्र साठे व भाजपचे इंद्रजित पवार हे एकत्र आले, त्यांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर तालुकाध्यक्षांची महत्वाची भूमिका राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दिलीप माने गटाच्या समर्थक असलेल्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे नियोजन झाले. त्याप्रमाणे उपसभापती जितेंद्र शिलवंत, संध्याराणी पवार, हरी शिंदे यांनी अविश्वास ठराव साठी अर्ज केला, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा काढली. मात्र निवड घेऊ नये म्हणून सभापती भडकुंबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानंतर पीठासीन अधिकारी प्रांत अधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयाकडून नोटीस देण्यासाठी पळापळ सुरू झाली. नंतर शुक्रवारी 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेत तीन विरुद्ध एक मताने ठराव मंजूर झाला.
दरम्यान या सभेचे कामकाज नियमाला अनुसरून नसल्याचा दावा करत रजनी भडकुंबे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पदाचा कालावधी सहा महिने राहिला असताना अशा प्रकारचा ठराव आणणे बेकायदा असल्याचेही आपल्या याचिकेत नमूद केले आहे. उच्च न्यायालयातील विधिज्ञ अभिजित कुलकर्णी यांच्यामार्फत त्यांनी हा दावा दाखल केला आहे. दाव्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता याप्रकरणी गुरुवार 28 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


















