सोलापूर : सन 2020 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायत येथील 108 सदस्य आरक्षित जागेवरून निवडून आले होते. त्या 108 सदस्यांपैकी 47 सदस्यांनी आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याचा अहवाल उत्तर तहसीलदार कार्यालयाने नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
तहसीलदारांच्या या अहवालाबाबत आता उतर तालुक्यातून काही ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर केले असतानाही त्या सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केला नसल्याचा अहवाल देण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावातील पाच सदस्य हे आरक्षित जागेवरून निवडून आले होते. त्या सर्व सदस्यांनी 27 जुलै 2021 रोजी तहसीलदार कार्यालयाला आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. असे असतानाही तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अहवालामध्ये बीबीदारफळ या गावच्या पाचही सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे सांगण्यात आले आहे. तहसीलदारांनी दिलेल्या अहवालामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये नाराजीचा सूर असून जिल्हाधिकारी यांच्याकडून कारवाई होईल अशा प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.