सोलापूर : हॉटेल बंद करण्याच्या वेळेस येऊन दारू मागितली, हॉटेल मालकाने दारू देण्यास नकार दिल्याने सहा व सात जणांनी मालकास जीवे मारण्याची धमकी देत धुडगूस घालून तोडफोड केली. ही घटना जुळे सोलापुरातील मयूरवन हॉटेलमध्ये गुरुवार तारीख 25 नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.
गणेश भाऊसाहेब अतकरे वय २८ वर्षे व्यवसाय – हॉटेल मॅनेजर, राहणार मुपो देगाव तालुका मोहोळ,यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. तर महादेव राम भंडारे, रा. १७९ मोदीखाना, महेश श्रीमंत कंपल्ली रा १२५ मोदीखाना व त्याचे इतर चार पाच अनोळखी जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीनी फिर्यादीच्या हॉटेलमध्ये मद्यपान करून हॉटेल बंद करण्याच्या वेळी दारू मागितली, फिर्यादी यांनी हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे असे सांगत असताना, या सर्वांनी हॉटेलमधील काऊटरमध्ये घुसुन त्यापैकी एका इसमाने त्याच्या खिशातील चाकूसारखा दिसणारी वस्तू काढुन तुम्ही आम्हास दारू पिण्यास नाही दिलात तर मारून टाकेन असे दमदाटी करून, दुसऱ्या एकाने काऊंटरवरील दारूचे बाटल्या घेऊन, फिर्यादीस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तू आम्हास दारू पिण्यास दिला नाही तर तुझा जिवच घेतो असे म्हणून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
त्यावेळी फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता, आरोपीनी हॉटेलमधील टेबल, टेबलावरील बाटल्या, फ्रीज अशा साहित्याचे तोडफोड करून नुकसान केले आहे. तपास पोना सोनार करत आहेत.


















