सोलापूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची मंगळवारी भेट घेतली यावेळी विकासात्मक बराच वेळ चर्चा झाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकांदे यांची उपस्थिती होती.
सुभाष देशमुख हे प्रामुख्याने दक्षिण तालुक्यातील सीमावर्ती गावांच्या विकासाच्या प्रश्नावर आले होते. सीमावर्ती भागातील गावे ही मॉडेल केली पाहिजेत. मॉडेल व्हिलेज म्हणून त्याची ओळख निर्माण व्हावी. दक्षिण सोलापूर तालुक्यातील साक्षरतेचे प्रमाण पाहता सुरुवातीला त्या गावच्या शाळा आणि ग्रामपंचायत इमारतीवर आपण फोकस करावा, त्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सीएसआर तसेच राज्य शासनाकडून अपेक्षित निधी मिळवून देण्यासाठी माझा पुरेपूर प्रयत्न राहील अशी भूमिका आव्हाळे यांच्यासमोर मांडली.
मॅडम तुमच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत, आमचा गरीब तालुका असून राज्याने मॉडेल म्हणून आपला पॅटर्न स्वीकारावा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाव घेतले पाहिजे असे काहीतरी करा अशा अपेक्षाही आमदार बापू यांनी व्यक्त केल्या.
सीईओ आव्हाळे यांनी सुरुवातीला आपण एक गाव प्रातिनिधिक स्वरूपात मॉडेल करू, त्या गावात सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करू, शाळा या नवीन टेक्नॉलॉजीनुसार झाल्या पाहिजेत, त्यासाठी प्रारूप आराखडा तयार करून पुढील दहा वर्षाचे नियोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.