सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आज जे यशाचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचे पहिले श्रेय जाते ते करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना. राष्ट्रवादीच्या ताब्यातून विधान परिषद खेचून आणण्यात आणि प्रशांत परिचारक यांना आमदार करण्यात संजय शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्तेमध्ये एन्ट्री करण्यात संजय शिंदे यांचाच आधार भाजपला घ्यावा लागला होता. सोलापूर जिल्ह्यात समविचारी आघाडी एकत्रित आणून भारतीय जनता पार्टीचे ताकद नकळत संजय शिंदे यांनी वाढवली.
तेच संजय शिंदे आता करमाळ्याचे अपक्ष आमदार आहेत राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय जवळचे आणि कट्टर समर्थक मानले जातात. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता अपक्ष आमदारांना महत्त्व प्राप्त झाले आहे. संजयमामांची सोलापूर जिल्ह्यावर चांगली पकड आहे सर्व पक्ष, आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समन्वय ठेवण्याची किमया त्यांच्याकडे आहे. त्यांना सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदार पदापर्यंत कामाचा अनुभव आहे तसेच त्यांची उद्योजक म्हणूनही ओळख आहे.
आमदार संजयमामा यांनी 2014 साली आमदार माजी आमदार प्रशांत परिचारक यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतून सत्ताबळ नसताना सर्व पक्ष नेत्याची मोड बांधून निवडून आणले हा इतिहास सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा सदस्य, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याही पक्षाचे संख्याबळ नसताना अध्यक्ष पद भूषविले. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना समान निधी वाटपाचे ऐतिहासिक धोरण तालुक्यातील लोकसंख्येनुसार राबवणारा महाराष्ट्रातील पहिला अध्यक्ष सन्मान त्यांनी घेतलाय. जिल्हा परिषद निधी वाटप करताना प्रत्येक तालुक्याला पक्ष विरहित आणि सर्व आमदार सदस्य आणि विविध गटाचे नेते यांना विश्वासात घेऊन समन्वय ठेवत कोणताही वाद न होता त्यांनी सर्वांना समान निधीचे धोरण राबविले. प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता, सर्वच शासकीय कामाची माहिती आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. शिवाय ते प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
सध्या सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पद हे भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे आहे परंतु त्यांना त्यांचा मतदारसंघाचा व्याप आणि त्यांच्याकडे असणाऱ्या खात्याची जबाबदारी यातून सोलापूर जिल्ह्याला वेळ देता येत नाही अशी भावना सोलापूर जिल्ह्याच्या सर्वसामान्य नागरिकांची आहे.
सध्या ते करमाळा तालुक्याचे आमदार असून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आहे. बंद असलेल्या अनेक योजना त्या सुरू पण केलेल्या आहेत त्याचा फायदा करमाळा मतदारसंघातील जनतेला होत आहे. संजयमामा शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असलेली निष्ठा आणि त्यांच्या निकटवर्ती असल्याने त्यांचा फायदा जिल्हयाला होणार आहे.
म्हणूनच सोलापूर जिल्ह्यात समन्वय साधणारा सर्वपक्षीय नेता म्हणून आमदार संजय शिंदे यांना मंत्रिपद देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मागील चार वर्षात स्थानिक पालकमंत्री नसलेला जिल्हा अशी सोलापूरची ओळख झाली आहे ती पुसून टाकण्यासाठी आमदार संजय शिंदे यांना मंत्री करून पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी आता सर्वत्र होत आहे.



















