भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली, बराच वेळ या दोन प्रमुख नेत्यांची चर्चा झाली, आगामी महापालिका निवडणुका विशेष करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची होती, मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
याच एकूण राजकिय घडामोडी नंतर सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यांना फोन करून मी तुमच्या कार्यालयात भेटायला येतो. दुपारी दीड च्या सुमारास जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, यांनी आमदार देशमुख यांचे स्वागत केले, देशमुख यांच्यासोबत नगरसेवक संजय कोळी उपस्थित होते. त्यानंतर विजयकुमार देशमुख यांनी बुके देऊन मनसे पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले, त्यानंतर मनसेच्या वतीने देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
बंद दरवाजा आड बराच वेळ चर्चा झाली, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे, भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भाजप आमदारांकडून भेटी सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिकेच्या निवडणुकीत ही भगवी युती होणार हे निश्चित झाल्याचं दिसत आहे.




















