सोलापूर : पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा. लाखो वारकरी भाविक पंढरपूरला शेकडो किलोमीटर वरून पायी येतात. या वारकऱ्यांप्रती अनेक जण आपापल्या पद्धतीने सेवा अर्पण करून सहभाग नोंदवतात. माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनीही आषाढी वारीत आपल्या पत्नीसह अशाप्रकारे सेवा अर्पण केली.
संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या या माळशिरस तालुक्यातूनच सोलापूर जिल्ह्यात आगमन करतात. शुक्रवारी श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे माळशिरस तालुक्यात आगमन झाले. आमदार राम सातपुते यांनी त्यांच्या पत्नी संस्कृती यांच्यासोबत पालखीचे स्वागत करत माऊलींचे मनोभावी दर्शन घेतले. यावेळी पालखीतील वारकऱ्यांची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली. शेकडो किलोमीटर पायी चालत आलेल्या वारकऱ्यांच्या हाता पायांची मालिश या पती-पत्नीने करून आपली मनोभावी सेवा अर्पण केली.
ही सेवा अर्पण केल्यानंतर आमदार सातपुते म्हणाले, माऊलींच्या पालखीतील वारकरी बंधू-भगिनींची सेवा करण्याचे, त्यांच्या हातपायांची मालिश करून देण्याचे सद्भाग्य लाभले आणि ही सेवा करून आम्ही उभयता धन्य झालो! माऊलींचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी नेहमी राहो.



















