सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, कार्यकारी अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील मागील अनेक वर्षे न सुटलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे बैठका लावल्या आहेत. बुधवारी तब्बल दीड तास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात चर्चा झाल्यानंतर उमेश पाटील यांनी ही माहिती दिली.
मोहोळ तालुक्यातील क्रीडा संकुल बांधण्यावरून आमदार यशवंत माने आणि उमेश पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. यावेळी बोलताना उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले, मोहोळ तालुक्याच्या विकासात कोणतेही राजकारण करणार नाही, उलट क्रीडा संकुलाला जागा मिळत असेल तर अडचण काय?पाच कोटी मंजूर झालेत, या विषयाची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे, त्याचे निमंत्रण प्रशासन देईल, मी स्वतः त्यांना बैठकीला येण्यासाठी फोन करतो, ते समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी नक्की यावे असे पाटील म्हणाले.
मोहोळ तालुक्यातील घाटणे बॅरेज आणि आष्टी उपसा सिंचन योजनेचा एक प्रलंबित प्रश्न म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा प्रश्न आहे, यापूर्वी 5 बैठका झाल्या, तो प्रश्न अंतिम टप्प्यात असून तो या बैठकीनंतर सुटेल. मोहोळ शहरातील पत्राचाळ भागातील 31 कुटुंबांच्या अतिक्रमणाचा विषय आहे, त्यांना जागा मिळण्यासाठी 15 वर्षांपासूनचा विषय आहे त्या संबंधी सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावण्यात आली आहे.
सोलापूर शहरातील प्राणी संग्रहालयाचा विषय सुध्दा उमेश पाटील यांनी हाती घेतला आहे, प्राणी संग्रहालयातील पशुवैद्यकीय दवाखान्याचा विषय असून तो सोडवण्यासाठी बैठक लावली आहे.


















