सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये सध्या ग्लोबल पुरस्कार विजेते रणजीत डिसले गुरुजींच्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा आहे. रणजीत डीसले यांच्या अनियमिततेवरून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पाच अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती त्या चौकशी समितीचा अहवाल आला आहे.
त्यापूर्वीच रणजीत डीसले यांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी पत्रकारांनी या विषयावर चर्चा केली असता, अद्याप चौकशी समितीचा अहवाल माझ्याकडे आलेला नाही मात्र त्यांनी राजीनामा दिला हे नक्की आहे. अहवाल काही का असेना पण तो सर्वांसमोर आणणार आहे, ती काही लपवण्यासारखी बाब नाही. असे त्यांनी सांगितले.
याचवेळी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनात आले. तेव्हा पत्रकारांनी “दादा तुमच्याच तालुक्याचा विषय सुरू होता” असे म्हणून त्यांना बोलते केले. रणजीत डीसले असे म्हणतात, बबनराव शिंदे यांनी बरे झाले त्यांनी राजीनामा दिला. त्याचा काही उपयोग नव्हता.
तब्बल वर्षभर परितेवाडीला शिक्षक नव्हता. दोन ते तीन वेळा तिथल्या ग्रामस्थांनी माझी भेट घेऊन त्यांची तक्रार केली होती. डीसले यांचा तिथल्या विद्यार्थ्यांना काहीही फायदा नव्हता. आता त्यानी राजीनामा दिल्याने दुसरा चांगला शिक्षक मिळेल अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.