उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे इथल्या श्री सिद्धनाथ शुगर मिल्स लिमिटेडच्या अकराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार दिलीप माने, संचालक धनंजय भोसले, संचालक पृथ्वीराज माने, जयश्री माने, शैलजा राठोड, बाळासाहेब सुरवसे, चंद्रकांत कुलकर्णी, नेताजी सुरवसे, केतन शहा, किसन भोसले, नागनाथ गवळी, बाबासाहेब पाटील, रेवनसिद्ध पुजारी, संभाजी पाटील, अनिल पाटील, एकनाथ ढवळे, गणपत बचूटे, विकास पाटील, चाचा चव्हाण, सुनील जाधव, जनरल मॅनेजर संजय जाधव , शेतकी अधिकारी बाबासाहेब काळे यांच्यासह दक्षिण व उत्तर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार बबनदादा शिंदे म्हणाले, दरवर्षी केंद्र सरकार एफआरपी वाढवते, मात्र एमएसपी वाढवत नाहीत, एमएसपी 3500 रुपये करावी तरच कारखानदार व शेतकऱ्यांना परवडेल. डिझेल दर वाढल्याने वाहतूकदारांनी संप केला आहे, त्यामुळे त्यांना साडेबारा टक्के वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर वाढल्याने यावर्षी साखर कारखानदारीला चांगले दिवस आहेत.
आम्ही कधीही शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र आमच्या हातात काय आहे, साखर विक्री आमच्या हातात नाही, भाव आम्ही ठरवतो का? इथेनॉल भाव सरकार ठरवते, राजू शेट्टी यांचे मागणे गैर नाही, त्यांनी कारखानदारांची भांडण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारशी भांडावे.
शरद पवार व नितीन गडकरी यांचे सातत्याने इथेनॉलच्या पाठीशी आहेत, भविष्यात साखर कारखान्यासमोर पेट्रोल पंप सुरू होतील,मोटारसायकल व वाहनांमध्ये बदल होणार आहेत, ज्यावेळी साखरेला भाव येतील त्यावेळी साखर काढू, ज्यावेळी पेट्रोलचे भाव येतील तेव्हा इथेनॉल काढू या दोन्ही योजना हातात राहिल्या तर साखर व्यवसाय स्थिर व्हायला फायदा होईल.
दिलीप माने यांनी मोठ्या कष्टातुन मागील चार पाच वर्षे काढले, व्याजाचे हप्ते तटले, बँकांची किरकिर मागे,तरीही खंबीरपणे ते या व्यवसायात टिकून आहेत.
दिलीप माने म्हणाले, मागील अकरा वर्षे यशस्वीरीत्या साखर कारखाना चालवला आहे. अडीच हजार मेट्रिक टनावरून आता सहा हजार मेट्रिक टन गाळप सुरू आहे. तसेच 25 मेगावॅट पॉवर जनरेशन चालते, कायम शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली असल्यामुळे शेतकर्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आता आमच्या हक्काच्या शेतकरी झाले आहेत. सिद्धनाथ बरोबर कंचेश्वर साखर कारखाना सुरु केला त्याठिकाणी इथेनॉल निर्मिती सुरू झाली आहे लवकरच सिद्धनाथला सुद्धा इथेनॉल निर्मिती सुरू होईल. यंदा शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा जास्त दर देणार असल्याचे सांगितले.
शेवटी आभार प्रदर्शन संचालक पृथ्वीराज माने यांनी मानले.

















