सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दिव्यांग विभागाचा कारभार अतिशय संशयास्पद असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांकडे चार्ज होता त्यांनी बराच गोंधळ दिव्यांग विभागात घातल्याचे कायमच बोलले जाते.
आता तर “शासन दिव्यांगांच्या दारी या उपक्रमाची जनजागृती आणि माहिती सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक दिव्यांग व्यक्तींना नसल्याने प्रहार संघटनेने तीव्र अशी नाराजी व्यक्त केली असून समाज कल्याण विभागातील दिव्यांग विभागाच्या कारभाराची तक्रार आमदार बच्चू कडू यांच्याकडे करणार असल्याची माहिती प्रहार संघटनेने सिंहासनशी बोलताना दिली आहे. तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांच्या कामाबाबत ही अनेक तक्रारी असून त्यांच्या चौकशीची मागणी ही करण्यात येणार असल्याचे समजले.
जिल्हा परिषद समाज कल्याणच्या दिव्यांग विभागातील माहिती अधिकाराची बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत. माहिती अधिकारातून माहिती दिली जात नाही. एखाद्या विषयाची माहिती मागितल्यास दिशाभूल करून तो अर्ज दिव्यांग संस्थेकडे वर्ग केला जातो त्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ सुरू असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
दिव्यांग संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर केल्या जात नसल्याची तक्रारी आहेत. सातव्या वेतन आयोगातील शिक्षकांची फरक रक्कम अर्थपूर्ण व्यवहारातून दिली जात असल्याची माहिती काही शिक्षकांनी कॅमेऱ्यासमोर न येता दिली आहे. वेतन जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून या वेतनाच्या पैशातून सातव्या वेतन आयोगाचा फरक दिला जातो त्यामुळे पगारी दोन ते तीन महिने केल्या जात नाहीत अशी ओरड समोर आली आहे. राज्य सरकार आपल्या बजेटच्या पाच टक्के रक्कम ही दिव्यांगांसाठी खर्च करतो मात्र हे बजेट या दिव्यांग नागरिकांवर खर्च केले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष करून जिल्हा परिषद दिव्यांग विभागाच्या कारभाराची चौकशी निश्चितच व्हावी अशी मागणी आता पुढे येत आहे.